२५० टन कचरा साचण्याचा दावा फोल ?
४ हजार ८०२ प्रति मेट्रिक टनानुसार मिळणार कॉन्ट्रॅक्टरला पैसे
अकोला, दि. १५
महापालिका क्षेत्रात घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासोबतच शहरातील संपूर्ण कचरा ४ हजार ८०२ प्रति मेट्रिक टनानुसार उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट नागपूर येथील मे. अर्बन इनव्हयरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. कॉन्ट्रॅक्टरने २२ ऑक्टोबर पासून काम सुरू केले आहे. शहरात दररोज २५० टन कचरा संकलित होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात सरासरी १५५ टन कचरा संकलन होत आहे. दरम्यान आता नागरिकांना सप्टेंबर महिन्याचे कचरा घंटागाडीला पैसे द्यावे लागणार असून पुढील महिन्यापासून कचरा घंटागाडीला दरमहा पैसे देण्याची गरज भासणार नाही. कारण आता नागरिकांना मालमत्ता करामध्ये ही रक्कम द्यावी लागणार आहे.
शहरात सद्यस्थितीत घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाते. तर शहराच्या विविध भागात तसेच बाजार परिसर निर्माण होणारा कचरा महापालिकेच्या वतीने उचलला जातो. मात्र आता कॉन्ट्रॅक्टरला घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासोबतच शहरात कोणत्याही ठिकाणी निर्माण झालेला कचरा उचलावा लागणार आहे. ज्या कचरा घंटागाड्या, ट्रॅक्टर तसेच जी वाहने महापालिकेची आहेत. ती कॉन्ट्रॅक्टरला भाड्याने दिले जाणार असून कॉन्ट्रॅक्टरला दरमहा द्यावे लागणाऱ्या देयकातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टरस घरोघरी संकलीत होणारा कचरा, रस्त्यालगत जमा झालेला कचरा, नालीतून काढलेला ओला कचरा, रस्त्यालगत तोडलेली झाडे, मेलेली जनावरे उचलावी लागणार आहेत. दरमहा कचरा संकलनाचे शुल्क घेण्या ऐवजी महापालिकेने मालमत्ता करात ६०० रुपये वाढविण्याचा निर्णय यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यामुळे नागरिकांना आता दरमहा कचरा घंटागाडी शुल्क ५० रुपये देण्याची गरज भासणार नाही.



