तीन महिन्यांच्या रखडलेल्या अनुदानाचा मार्ग मोकळा; गोरगरिबांना सवलतीच्या दरात जेवण मिळण्याचा मार्ग सुकर
अकोला, दि. १५
गोरगरिबांना अल्प किंमतीत सकस जेवण उपलब्ध करून देणाऱ्या अत्यंत लोकप्रिय ‘शिवभोजन’ योजनेअंतर्गत रखडलेले अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अकोला जिल्ह्यासाठी १ कोटी ६३ लाख ७१ हजार ८८० रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून नियमित अनुदान मिळत नसल्यामुळे केंद्र संचालक आर्थिक संकटात सापडले होते आणि केंद्र बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता निधी मंजूर झाल्याने शिवभोजन केंद्र सुरळीतपणे सुरू राहणार असून, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वसामान्यांना स्वस्थ आणि पौष्टिक जेवण मिळावे, या उद्देशाने २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. प्रारंभी अकोलातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर आणि सर्वोपचार रुग्णालय या दोन ठिकाणी २०० थाळी प्रतिदिन क्षमतेचे केंद्र कार्यान्वित झाले होते. त्यानंतर कोविड संकटाच्या काळात या योजनेचा वाढीव इष्टांक मंजूर करण्यात आला होता. परंतु, मागील काही काळापासून वेळेवर अनुदान न मिळाल्यामुळे केंद्र चालवणे कठीण झाले होते. केंद्र बंद झाल्यास त्याचा थेट फटका हातावर पोट असलेल्या गरिबांना बसला असता; परंतु आता शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने हा प्रश्न सुटला आहे.
शिवभोजन योजनेअंतर्गत सन २०२६ मधील जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत ई-पॉस (श-झेड) प्रणालीवर नोंदवलेल्या वितरित थाळ्यांच्या संख्येने हा निधी निश्चित करण्यात आला आहे. शहरी केंद्रांसाठी: प्रति थाळी ४० रुपये तर ग्रामीण केंद्रांसाठी: प्रति थाळी २५ रुपये या दरानुसार अकोला जिल्ह्यासाठी शहरी केंद्रांकरिता १ कोटी ३२ लाख ६४ हजार २८० रुपये, तर ग्रामीण केंद्रांसाठी ३१ लाख ७ हजार ६०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.




