अकोला जिल्हा

घरकुलच्या वाढीव अनुदानावर दलालांची गिधाडदृष्टी !

लाभार्थीच्या आनंदात विरसन; आर्थिक गंडा लावण्याचा प्रयत्न

सावरगाव, दि. १५

शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याची घोषणा होताच पातुर तालुक्यातील ग्रामीण भागात कथित दलाल सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाढीव अनुदानाची रक्कम मंजूर करून देतो, तसेच अनुदानाची रक्कम काढून देण्यासाठी मदत करतो, असे आमिष दाखवून गोरगरीब लाभार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. पातुर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे.

अनेक लाभार्थी आपल्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून आहेत. अशाच राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी वाढीव अनुदानाची घोषणा केल्याने लाभार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने काहीजण लाभार्थ्यांशी संपर्क साधून वाढीव अनुदान मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत असल्याची चर्चा आहे. शासकीय प्रक्रियेची पुरेशी माहिती नसलेल्या अशिक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना लक्ष्य करून आर्थिक गंडा लावण्याचा प्रयत्न होत आहे. अनेकांना तर आर्थिक गंडा लावण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावनिहाय घरकुल लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *