दुष्काळार मात करत फुलवली सीताफळाची बाग!
सावरगाव, दि. १५
दुष्काळ, पाणीटंचाई आणि नापिकीच्या संकटाामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, योग्य पीक निवड आणि जिद्दीच्या जोरावर शेतीत यश मिळवता येते, हे मेहकर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी गणेश माडोकार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पातुर तालुक्यातील सावरगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतात त्यांनी सीताफळाची बाग फुलवून दुष्काळातही आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. सोयाबीन, तूर आणि कपाशी यांसारख्या पारंपरिक पिकांना यंदा दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत गणेश माडोकार यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचे तंतोतंत नियोजन करून सीताफळाच्या बागेला जगवले. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरत त्यांनी बागेची योग्य निगा राखली आणि त्यातून समाधानकारक उत्पादन मिळवले.
विशेष म्हणजे, या सीताफळाच्या बागेतून त्यांना एकरी तब्बल ५० हजार रुपयांचा निख्वळ नफा मिळाला आहे. पारंपरिक पिकांच्या सततच्या अनिश्चिततेला पर्याय म्हणून फळबाग शेतीकडे वळल्यास दुष्काळी परिस्थितीतही उत्पन्नाचा आधार मिळू शकतो, हे त्यांच्या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. दुष्काळ म्हणजे शेतीतील अपयश नव्हे, तर उपलब्ध साधनांचे योग्य नियोजन करण्याची कसोटी आहे, हा संदेश गणेश माडोकार यांच्या यशस्वी प्रयोगातून मिळत आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न मिळवण्याचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.




