उपक्रमातून घटनात्मक मूल्यांची रुजवणूक : वैशाली रामटेके
। मूर्तिजापूर, दि. ०७।
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा, कानडी येथे मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी ‘संवेदनांची दिवाळी’ हा उपक्रम उच्च श्रेणी मुख्याध्यापिका लता सोळंके यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. शाळेतील शिक्षिका कीर्तीमाला राऊत यांनी सदर उपक्रमाची धुरा सांभाळली. सदर उपक्रमास पंचायत समिती मूर्तिजापूरच्या गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके व कानडी केंद्र समन्वयक रविष गवई यांनी भेट दिली.
पंचायत समिती मूर्तिजापूरच्या गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आणि पणत्या व आकाशकंदील यांची खरेदी केली. याप्रसंगी गट समन्वयक कैलास सोळंके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सोहळ्याला साधन व्यक्ती मीना इंगोले ह्या देखील उपस्थित होत्या.
गरिबांची दिवाळी साजरी व्हावी या प्रामाणिक व पवित्र उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन कानडी शाळेत करण्यात आले. सदर उपक्रमामध्ये आकाश कंदील निर्मिती व पणत्यांची सजावट विद्यार्थ्यांनी केली. आकाश कंदील व पणत्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सदर विक्रीतून आलेला संपूर्ण निधी निराधार व गरजूसाठी झटणाऱ्या ‘एक उच्च जाणीवेचा’ या सेवाभावी संस्थेला देण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, नम्रप्रतिष्ठा, समाजसेवा, राष्ट्रभक्ती, सर्जनशीलता, सौजन्यशीलता, सर्वधर्मसहिष्णुता आदी मूल्यांची नकळत रुजवणूक झाली. सदर उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद सो. मेघना वाडकर, कु. शीतल मदनकर यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाद्वारे स्वतःची दिवाळी साजरी करत दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली त्यामुळे अशी अनोखी दिवाळी साजरी करण्याचा आनंद प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. सदर उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे कौतुक परिसरात होत आहे. सदर उपक्रमाची मुख्य भूमिका कीर्तीमाला राऊत यांनी प्रास्ताविकातून मांडली. दिवाळी संवेदनांची या सोहळ्याचे सूत्रसंचालन अमोल गोड बनकर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक गझलकार संदीप वाकोडे यांनी केले.


