१२,६६८ कोटींच्या थकबाकीप्रकरणी एनसीएलटीचा मोठा निर्णय
। मुंबई, दि. ७।
मुंबई राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायालयाच्या (एनसीएलटी) मुंबई पिठाने व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचे माजी प्रवर्तक आणि संचालक वेणुगोपाल नंदालाल धूत यांना ‘दिवाळखोर’ घोषित केले आहे. स्टेट बँकेने दाखल केलेली याचिका स्वीकारत न्यायालयाने हा हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. धूत यांनी स्टेट बँक आणि तिच्याशी संलग्न असलेल्या (आता बँकेत विलीन झालेल्या) बँकांकडून व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजला मिळालेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती, जी त्यांनी परत न केल्यामुळे १२,६६८ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली होती.
न्यायमूर्ती विनय गोयल (न्यायिक सदस्य) आणि चरणजित सिंग गुलाटी (तांत्रिक सदस्य) यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात दिवाळखोरीची पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका ‘दिवाळखोरी विश्वस्तां’ची (बँकरप्टसी ट्रस्टी) नियुक्ती केली आहे. धूत यांच्या सर्व धनकौंकडून दाव्यांची मागणी करण्यासाठी सार्वजनिक नोटिस जारी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, त्यांच्या मालमत्तेची विभागणी धनकोंमध्ये केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आते. तसेच, धूत यांना त्यांच्या वित्तीय स्थितीचा तपशील सात दिवसांच्या आत विश्वस्तांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने स्टेट बँक आणि तिच्या तत्कालीन सहयोगी बँका – स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर आणि स्टेट बँक ऑफ पटियाळा यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. या कर्जासाठी वेणुगोपाल धूत यांनी वैयक्तिक जामीनदार म्हणून हमी दिली होती. कर्जाची परतफेड न झाल्याने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत व्याज व दंडासह एकूण थबակի १२,६६८.०६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
यापूर्वी ८ एप्रिल २०२६ रोजी एनसीएलटीने धूत यांच्याविरोधात वैयक्तिक दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेदरम्यान धूत यांनी १६ जून २०२६ रोजी ६०० कोटींच्या परतफेडीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव केवळ मान्य झालेल्या एकूण थबակիच्या ०.४२ टक्के इतकाच होता आणि तो कोणत्याही आगाऊ रकमेविना भविष्यातील प्रकल्पांवर आधारित होता. त्यामुळे १७ जुलै रोजी एनसीएलटीने हा प्रस्ताव फेटाळून प्रक्रिया संपुष्टात आणली.




