नागपूरच्या दिव्या देशमुख व नाशिकच्या विदित गुजरातीला अर्जुन पुरस्कार
। नवी दिल्ली, दि. १३।
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती आणि नागपूरच्या दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चौहान यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड या संस्थेला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय यश, नेमबाजीतील उत्कृष्ट प्रशिक्षण आणि दिव्यांग सैनिकांच्या क्रीडा पुनर्वसनातील उल्लेखनीय योगदानाच्या জোरावर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये आपली ठळक छाप उमटवली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आज आयोजित विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नाशिकचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती याने बुद्धिबळ क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुडापेस्ट येथे झालेल्या ४५ व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये सुवर्णपदक, हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक त्याने मिळवले आहे तसेच आयल ऑफ मॅन येथे झालेल्या फिडे ग्रँड स्विस २०२३ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी त्याने केली आहे. त्याच्या या आंतरराष्ट्रीय यशाची दखल घेत त्याला अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.




