महाराष्ट्र

छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाबाबत सांगितलेली माहिती खरीच असेल

| मुंबई, दि. १३ |

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तवयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ सांगत असतील ती माहिती खरीच असेल, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये विलीनीकरणाबाबत खरंच काही सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुनील तटकरे यांनी यावेळी छगन भुजबळ आजारी असताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचं भुजबळ सांगत असतील तर तशा चर्चा झाल्या असतील, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

“छगन भुजबळ यांच्यावर एशियन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. त्याआधीच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. आज छगन भुजबळ सांगत आहेत म्हणजे त्यांनी त्या चर्चेमध्ये हॉस्पिटलमधून जो सहभाग घेतला असेल त्याबद्दल ते सांगत असतील,” असं सुनील तटकरे म्हणाले. “त्यांनी मला पूर्वसूचना दिली होती. आता त्यावेळेला मी का नाही बोललो, आता का बोललो? तर त्या त्या वेळेला काय बोलावं आणि काय नाही, प्रत्येकाचा एक विषय असतो, योग्यवेळेला त्या संदर्भात मी बोलेन, पण ही वस्तुस्थिती खरी आहे,” असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. “छगन भुजबळ आजारी असताना अजित दादा त्यांना बघायला गेले होते. त्यानंतर जयंत पाटील गेले होते. त्यावेळेला विलीनीकरणाची चर्चा झाली असेल आणि ते भुजबळ सांगत असतील तर ती माहिती खरीच असेल. कारण ते त्या चर्चेत होते,” अशीदेखील प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माझी नेहमीच चर्चा होत असते. त्यांचा शरद पवारांच्या भेटीच्या व्हिडीओत ते गोंदियाला जाणार असल्याची माहिती देत होते. १० तारखेला आपण गोंदिया येथून मुंबईत येणार आहोत, असं प्रफुल्ल पटेल शरद पवारांना सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “पक्षाची बैठक गेल्या आठवड्यात मंगळवारी झाली. आमचे पालकमंत्री आणि मंत्र्यांना प्रत्येकी दोन जिल्हे देण्यात आले असून त्यांना दुष्काळी दौऱ्यावर जाण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. हे सलग काम पुढचे तीन आठवडे मंत्री आणि नेमून दिलेल्या सहकाऱ्यांनी करायचा असा विषय बैठकीच्या चर्चेत होता. एसआयआरच्याबाबत संघटनेच्या मांडणीची चर्चा बैठकीत झाली होती. तीच चर्चा आम्ही आमदारांशी केली होती,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

“शरद पवारांचं पुढच्या महिन्यात १२ डिसेंबरला ७६ वर्षे पूर्ण होऊन ७७ व्या वर्षात पदार्पण असेल. शरद पवारांच्या वाढदिवशी देशातील जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतात. आता योगायोगानं त्यांच्या जन्मदिवसाची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे काही घटना घडत आहेत का अशी चर्चा गेल्या दहा-बारा दिवसांपासून सतत होत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्याकडे जी माहिती आहे, यामध्ये कुठे हालचाली किंवा काही वेगळं वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *