क्रीडा

आज रंगणार भारत-पाक फायनल

पाकिस्तानचा हिसाब चुकता करण्याची भारताला सुवर्णसंधी !

। मस्कत, दि. १३।

१९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. या दिमाखदार विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, आता जेतेपदासाठी भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशवर ९ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले होते. दरम्यान, काल गुरुवारी ओमानमधील अल अमीत क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिстанने ५० षटकांत ८ बाद २२७ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल भारताने कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानीच्या ९३ आणि आर्यवीर सेहवागच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर विजयाचे लक्ष्य सहज गाठत अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले.

गुरुवारी झालेल्या या विजयासह भारताला साखळी फेरीतील पराभवाचा वचपा घेण्याची संधी चालून आली आहे. साखळी फेरीत पाकिस्तानने भारताचा ३ गडी राखून पराभव केला होता. आता १९ वर्षांखालील एकदिवसीय आशिया चषक २०२६ चा अंतिम सामना उद्या शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी ओमानमधील अल अमीत क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी १० वाजता होईल. साखळी सामन्यातील पराभवाचा हिसाब चुकता करत आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी भारतीय युवा संघ सज्ज झाला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *