भंडारा । तुमसर तालुक्यातील माडगी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामादरम्यान दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चारगाव येथील होमगार्ड जवान गजानन मोहन तिजारे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी अडकल्याने तिजारे यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ऐन दिवाळीत कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माडगी परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू असून रस्त्यालगत मातीचे ढिगारे पडून आहेत. संबंधित ठिकाणावरून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. याचदरम्यान तिजारे यांची दुचाकी अडकल्याने अपघात घडल्याची माहिती आहे.




