परिणय फुके यांचे मुलाच्या अपघाताबाबत स्पष्टीकरण!
। नागपूर, दि. १३ ।
पेंच अभयारण्य परिसरातील अपघातावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेले आरोप दुर्दैवी आणि आक्षेпаई असल्याचे सांगत आमदार डॉ. परिणय फुके यांनी या प्रकरणाचे राजकारण टाळण्याचे आवाहन केले. पेंच अभयारण्य परिसर घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि काही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आपल्याबरोबरच कुटुंबावर करण्यात येत असलेले आरोप चुकीचे असून, त्यातून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. अपघाताग्रस्त वाहनात आपला मुलगा नव्हता, तर तो दुसऱ्या वाहनात होता, असा खुलासा त्यांनी केला. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे.
मात्र, अपघात नेमका कसा घडला, त्यावेळी काय परिस्थिती होती आणि या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती पोलिसांच्या माध्यमातूनच समोर येणार आहे. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचे फुके यांनी म्हटले आहे. या अपघातात ज्या तरुणाचा मृत्यू झाला, तोदेखील आपल्यासाठी मुलासारखाच होता. त्याच्या कुटुंबीयांशी आपले स्नेहाचे संबंध आहेत. या तरुणाच्या दुर्दैवी निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांप्रमाणेच आपले कुटुंबही दुःखात असल्याचे फुके यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे आपले कुटुंब अद्याप सावरलेले नाही. अशा दुखद प्रसंगात संवेदनशीलता दाखविण्याऐवजी राजकीय आरोप करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. मृत तरुणाच्या कुटुंबीयाशी असलेले आपले संबंध आणि या घटनेमुळे झालेल्या दुःखाची जाणीव लक्षात घेता, या प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोणून पाहू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
अपघातासंदर्भात कोणतीही ठोस माहिती किंवा पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालेली वस्तुस्थिती समोर आलेली नसताना आरोप करणे चुकीचे आहे. अशा आरोपांमुळे आपली आणि कुटुंबीयांची जाणीवपूर्वक बदनामी होत असल्याचा दावा फुके यांनी केला. अपघाताची कारणे, वेळची परिस्थिती आणि संबंधितांची भूमिका याबाबत निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. तपास पूर्ण होण्यापूर्वी राजकीय आरोपांच्या माध्यमातून वातावरण निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.




