संविधानाला नाकारणारी नवी पिढी घडवण्याचा प्रयत्न होत आहे
गडचिरोली, दि. १५
बंदुकीच्या जोरावर चालणाऱ्या सशस्त्र नक्षलवादापेक्षा समाजात वैचारिक पातळीवर रुजत असलेला बौद्धिक नक्षलवाद अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशाचे संविधान आणि प्रस्थापित व्यवस्था नाकारणारी नवी पिढी घडवण्याचा प्रयत्न या विचारधारेतून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यानिमित्त गडचिरोलीला आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.
सशस्त्र नक्षलवादाचा प्रभाव कमी होत असताना वैचारिक पातळीवरील आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशा प्रवृत्तींना प्रत्युत्तर देताना संविधानाच्या चौकटीतच लढा द्यावा लागेल. देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समान संधी देण्याची क्षमता संविधानात आहे, हे सततपणे समाजासमोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील बदलते चित्र देशभर पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर फडणवीस यांनी भर दिला. देशाच्या विविध भागातील कंटेट क्रिएटर्स, लेखक आणि सोशल मीडिया प्रभावक गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी येथील परिवर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलमुक्ततेच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यात होत असलेली प्रगती, विकासकामे आणि बदललेली सामाजिक परिस्थिती या प्रतिनिधींनी जवळून पाहिल्याचे ते म्हणाले.
नक्षलवादाची ओळख असलेल्या गडचिरोलीची विकासाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असून जिल्ह्यातील विकासप्रक्रिया आणि वैचारिक आव्हाने या दोन्ही मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केले.




