खामगाव, दि. १५
रविवारी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ मृत्यूच्या सावटाखाली गेली. रस्त्यावरून प्रवासाला निघालेले पाच जण पुन्हा घरी परतलेच नाहीत. कुठे दुचाकीची ट्रकला धडक, तर कुठे एसटी बसची जोरदार धडक, तीन वेगवेगळ्या अपघातांनी पाच कुटुंबातील आनंद हिरावून घेतला. या घटनांनी खामगाव परिसर सुन्न झाला आहे. पारखेड फाट्याजवळ दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर खामगाव-नांदुरा मार्गावर ट्रकला धडकेत एकाचा आणि खामगाव-चिखली मार्गावर एसटी बसच्या धडकनेत आणखी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांनी परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खामगाव-मलकापूर मार्गावरील पारखेड फाट्याजवळ रविवारी रात्री ७.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. खामगाավून मलकापूरकडे जाणाऱ्या एमएच-२८-सीए-०३४१ क्रमांकाच्या दुचाकीला मागून आलेल्या वाहनाने धडक दिली. त्यामुळे दुचाकी समोरील ट्रकला आदळली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, दुचाकीस्वार्याचे हेल्मेटही तुटून पडले. या दुर्घटनेत दिगंबर चंद्रकांत इंगळे (३५), मयूर निवास भोले (२८) आणि परेश सुरेश घुले (१८, तिघेही रा. मुक्वाईनगर तालुक्यातील घाणखेड व मलकापूर तालुक्यातील हरणखेड) यांचा मृत्यू झाला.
खामगाव-नांदुरा मार्गावरील तेजराव पवार यांच्या शेताजवळ १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ ते ६ दरम्यान ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यात सुनील दशरथ इंगळे (४२, रा. उटी खुर्द, ता. जळगाव जामोद) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक शंकरलाल बागेलाल गोंड (२८, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खामगाव-चिखली मार्गावरील गारदगाव शिवारातील पेट्रोलपंपासमोर दुपारी १.३० वाजता हिरकणी एसटी बसने दुचाकीला धडक दिली.




